उद्योगांच्या समस्या तत्काळ मार्गी लावणार – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
प्रकाशन दिनांक : 18/11/2021
जिल्हा उद्योग मित्र समितीच्या बैठकीत जिल्हाधिका-यांची ग्वाही
औरंगाबाद, दिनांक 17 (जिमाका) : औरंगाबाद जिल्ह्याची ओळख उद्योग नगरी आहे. याठिकाणी अधिकाधिक उद्योग यावेत, यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. शिवाय जिल्ह्यातील विविध उद्योजकांच्या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रशासनाकडून सर्वोतोपरी मदत करण्यात येणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज उद्योजकांना दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक श्री.चवहण यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप रोकडे, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेश जोशी, महामंडळाचे कार्यकारी अभियंता श्री. गिरी, जिल्हा अग्रणी बँकेचे श्री. उनवणे, मसिआचे किरण जगताप, गजानन देशमुख, दुष्यंत आठवले, किरण जगताप, सीएमआयएचे सतीश लोणीकर, उद्योग क्रांतीचे सुरेश फुलारे आदींसह विविध उद्योग संघटनांचे पदाधिकारी, उद्योजकांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी चव्हाण यांनी उद्योजकांच्या सर्व समस्या ऐकून घेऊन त्या तत्काळ सोडविण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आदेशित केले. उद्योजकांनी औरंगाबाद, पुणे महामार्गावरील छावणी परिसरातील उड्डाणपूल येथे मोठ्याप्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. या पुलाचे व रस्त्याचे काम तत्काळ पूर्ण करण्यात यावे. साजापूर ते एमआयडीसी वाळूज रस्त्याची जोडणी, ओऍसिस चौकात उड्डाणपूल बांधणे, एमआयडीसी क्षेत्रा बाहेरील गट नंबरमध्ये असलेल्या उद्योजगांना सोयीसुविधा उपलब्ध करणे, ग्रामंपचायत कर आकारणी सुलभ करणे, वाळूज औद्योगिक परिसरातील गट नंबर, चिकलठाणा एमआयडीसी क्षेत्रात उद्योगांना मुलभूत सुविधा, आवश्यक परवाने, दर्जेदार रस्ते, वीज, पाणी पुरवणे, शेंद्रा औद्योगिक क्षेत्रामध्ये एमआयडीसीने राखीव ठेवलेल्या जागेवर स्वतंत्र पोलिस स्टेशनची निर्मिती करणे, चिकलठाणा औद्योगिक क्षेत्रातील कचरा नियमित उचलण्यात यावा आदी उद्योजकांच्या समस्यांवर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कार्यवाही करण्याचे आदेश संबंधितांना दिले. तसेच आवश्यक त्या समस्यांवर उद्योगमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली उद्योजकांची बैठक बोलावून समस्यांचे निराकरण करण्यात येईल, अशी ग्वाही उद्योजकांना दिली. त्याचबरोबर सर्व उद्योजकांनी त्यांच्या उद्योजकांशी संबंधित सर्वांनाच कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन श्री. चव्हाण यांनी केले.
बैठकीत समितीचे सदस्य सचिव श्री. रोकडे, एमआयडीसीचे श्री.जोशी व श्री. गिरी यांनीही उद्योजकांना आवश्यक ती माहिती उपलब्ध करून देत मार्गदर्शन केले.