बंद

आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रकाशन दिनांक : 04/11/2020

औरंगाबाद, दिनांक 03 (जिमाका) : केन्द्रीय निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूकीचा कार्यक्रम दि. 2 नोव्हेंबर 2020 रोजी जाहीर केला असून या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया कालावधीत आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सुनील चव्हाण यांनी आज येथे दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी बाबतच्या बैठकीत श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी मनपा आयुक्ती अस्तिक कुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश गोंदावले, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, पोलीस उपायुक्त मीना मकवाना, अप्पर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांच्यासह संबंधित अधिकारी, विविध यंत्रणाप्रमुख, क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. चव्हाण म्हणाले, निवडणूक कार्यक्रम यशस्वीरीत्या राबवण्यात आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे हे बंधनकारक असून सर्व यंत्रणांनी त्यादृष्टीने तातडीने कार्यवाही पुर्ण करून अहवाल सादर करावा. सर्व यंत्रणांनी आपल्या कार्यक्षेत्रातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी यांच्याकडील शासकीय वाहने, दुरध्वनी सेवा याबाबत नियमानुसार कार्यवाही करावी, जेणेकरून कुठल्याही प्रकारे आचार संहीता भंग होण्याचा प्रकार घडणार नाही. त्याचप्रमाणे जिल्ह्यात सर्व ठिकाणी शहरी, ग्रामीण सर्व परिसरात सार्वजनिक ठिकाणांवर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, पक्ष, त्यांचे चिन्ह, प्रतिमा व इतर अनुषंगिक बाबी जाहिरात फलक, बॅनर्स, झेंडे या व इतर माध्यमातून प्रसारीत केलेल्या असतील तर त्या सर्व काढून घ्याव्यात. तसेच ज्या ठिकाणी काढणे शक्य नसेल तिथे त्या झाकुन ठेवण्याची व्यवस्था तातडीने करावी, असे निर्देशीत करून श्री. चव्हाण यांनी आता आचारसंहिता कालावधी सुरू झालेला असल्यामुळे कुठल्याही प्रकारची नवीन विकास कामांना मंजूरी देऊ नये, नवीन कामांचे भूमीपूजन, उद्घाटन या गोष्टी करू नयेत. आयोगाने आचारसंहिता पालन करण्याबाबत निर्देशित केलेल्या सर्व नियमांचा अभ्यास करून त्यानुसार सर्वांनी त्याचे कटाक्षाने पालन करावे, असे निर्देशित केले.

तसेच नियमानुसार प्रचार कार्यक्रमांसाठी परवानगी घेणे उमेदवार, पक्षांना बंधनकारक आहे. अशा परवानगीसाठी विहीत मुदतीत संबंधितांनी अर्ज करणे तसेच कार्यक्रम नियमांचे पालन करून घेणे बंधनकारक आहे, त्याप्रमाणे संबंधितांकडून नियमांचे पालन करण्याच्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी खबरदारी घ्यावी, असे निर्देशित करून जिल्हाधिकारी यांनी निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सुरक्षितपणे पार पाडण्याच्या दृष्टीने प्रशासनामार्फत सर्व खबरदारी घेण्यात येणार आहे. सर्व मतदान केंद्रावर थर्मल गन, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सींगचे पालन यासह मतदान केंद्रावरील अधिकारी, कर्मचारी, मतदार या सर्वांसाठी कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रशासनामार्फत राबवण्यात येणार असून अतिरिक्त वाहनव्यवस्था, मनुष्यबळाचीही तयारी ठेवण्यात आली असल्याचे श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

तसेच निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्याच्या दृष्टीने सर्व नोडल अधिकारी आणि संबंधितांनी गांभिर्यपुर्वक सोपवलेली जबाबदारी पार पाडणे बंधनकारक असून जे अधिकारी, कर्मचारी कामामध्ये हयगय करतील त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असे निर्देशित करून जिल्हाधिकारी यांनी यावेळी बैठकीस अनुपस्थित असलेल्या 19 जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली.

अपर जिल्हाधिकारी अनंत गव्हाणे यांनी निवडणूक प्रक्रियेत आचारसंहितेचे काटेकोर पालन करणे ही महत्त्वपुर्ण जबाबदारी असल्याचे सांगून सर्व निवडणूक प्रक्रियेत तिचे पालन करण्याच्या दृष्टीने तत्पर रहाणे गरजेचे असल्याचे सांगितले. आचारसंहिता कालावधीत उमेदवार विनापरवानगी कोणतीही बाब, कोणत्याही माध्यमातून प्रचाराच्या अनुषंगाने कृती करून शकत नाही. याचे गांभिर्य लक्षात घेऊन सर्वांनी आचारसंहितेचे पालन करून घेण्यासाठी सज्ज रहावे. असे सूचीत करून श्री. गव्हाणे यांनी आदर्श आचारसंहिता, नियमावली अंमलबजावणी, घ्यावयाची खबरदारी याबाबत यावेळी मार्गदर्शन केले.

आदर्श आचारसंहितेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी