आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना तत्पर मदत देण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश
प्रकाशन दिनांक : 18/05/2021
औरंगाबाद, दि.18, (जिमाका) :- कर्ज, नापिकी, नैराश्य आणि अशा विविध कारणांमुळे आत्महत्यग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना शक्य होईल तेवढी मदत वेळेच्या आत मिळावी यासाठी तालुकास्तरावरील महसूल यंत्रणा व पोलीस यंत्रणा यांच्या समन्वयाने वेळीच गरजू कुटुंबियांना मदत मिळवून द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील समिती सभागृहात आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांविषयीच्या उभारी या प्रकल्पाअंतर्गत आयोजित केलेल्या बैठकीत दिले.
या बैठकीस निवासी जिल्हाधिकारी संजीव जाधवर, नोडल अधिकारी तथा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील तहसीलदार व संबंधित अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी एकूण 27 प्रकरणांवर जिल्हास्तरीय समितीने चर्चा करुन यामध्ये 2 प्रकरणांमध्ये नामंजूर आणि 2 प्रकरणांचे फेरतपासणीचे आदेश जिल्हाधिकारी यांनी संबंधित यंत्रणेला दिले.
माणूसकीच्या भावनेतून गरजूंना आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदत मिळवून देण्यासाठी संबंधित पोलीस यंत्रणा आणि संबंधित समिती सदस्यांनी अधिक लक्ष घालावे. नापिकी, कर्जाचे ओझे, कमी उत्पन्न यामधून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी विविध विभागांमार्फत काही उपाययोजना करता येतील का? याचाही विचार करुन तशी उपाययोजना करावी. तसेच त्या त्या संबंधित स्थानिक प्रशासकीय यंत्रणेने संवेदना जाग्या ठेवून काम करावे. त्यांच्या कुटुंबियांना ज्या स्वरुपात मदत करता येईल ती करण्यासाठी प्रशासकीय प्रस्तावांचा पाठपुरावा करावा अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी उपस्थित समिती सदस्यांना दिल्या.
