बंद

आडगावात खावटी तसेच इतर साहित्यांचे वाटप

प्रकाशन दिनांक : 14/07/2021

औरंगाबाद, दिनांक 13 (जिमाका):- औरंगााबद तालुक्यातील आडगाव (बु.) येथे शासनाच्या आदिवासी विकास विभागाकडून खावटी अुनदान योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देण्यात आला. उपविभागाीय अधिकारी रामेश्वर रोडगे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात लाभार्थ्यांना खावटी व  इतर साहित्यांचे वाटप करण्यात आले.

तालुक्यातील आडगाव(बु.) येथे अदिवासी विभागा मार्फत पात्र लाभार्थ्यांना खावटी व इतर साहित्य वाटपाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शानाखाली आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री.रोडगे होते. तसेच जिल्हा परिषद सदस्य रमेश पवार, सरपंच गोरख निकम, उपसरपंच अशोक लोखंडे, तहसीलदार ज्योती पवार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी देवकन्या बोकडे, सहायक प्रकल्प अधिकारी रमेश भडके, विनोद सांगळे, उद्धव वायाळ, सहायक पोलीस निरीक्षक भागवत नागरगोजे, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी आदींचीही उपस्थिती होती.

जिल्ह्यात खावटी अनुदान योजनेअंतर्गत पारधी, भिल्ल, ठाकर, ठाकूर, धनवर, कोळी मल्हार, कोकणी, गोंड, कोळी महादेव जमातीतील एकूण पाच हजार 391 लाभार्थ्यांचे निवड करण्यात आली आहे. त्यापैकी औरंगाबाद तालुक्यातील 426 पात्र लाभार्थी यांची निवड झाली. यातील आडगाव (बु.) येथे हौसाबाई बरडे, लहु बरडे, तुकाराम गायकवाड, अशोक गायकवाड, नवनाथ मोरे आदी अनुसूचित जमातीतील एकूण 19 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरुपात खावटी अनुदान योजनेचा लाभ देण्यात आला.

आडगाव (बु.) येथे अनेक कुटुंबे अनुसूचित जमातीतील आहेत. त्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून द्यावा, असे आवाहन श्री. पवार यांनी केले. अनुसूचित जमातीतील ग्रामस्थांनी  शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी जात प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करावी. प्रशासनाकडून सर्वोतोपरी मदत ग्रामस्थांना करण्यात येईल, अशी ग्वाही श्री.रोडगे यांनी यावेळी दिली. तर श्रीमती बोडके यांनी आदिवासी विकास विभागाच्या विविध योजनांची यावेळी माहिती उपस्थितांना दिली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मच्छिंद्र घोरपडे यांनी केले. आभार सांगळे यांनी मानले.