बंद

आंतरजिल्हा वाहतुकीसाठी खाजगी प्रवासी बसेस मानक कार्यपद्धती जारी

प्रकाशन दिनांक : 04/09/2020

औरंगाबाद, दि.04 (जिमाका) :- आंतरजिल्हा प्रवाशांच्या प्रवासावरील निर्बंध दुर करण्यात आले असून या प्रवासास आता परवानगी देण्यात आली आहे. या प्रवासासाठी आता वेगळ्या परवानगीची आवश्यकता असणार नाही. या प्रवासाबाबत खालील मानक कार्यपद्धती खाजगी प्रवासी बसेस वाहन मालक यांनी अवलंब करणे आवश्यक असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.

          या मानक कार्यपद्धतीनुसार खासगी प्रवासी बस ऑपरेटर यांनी कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने तसेच परिवहन विभागाने निर्गमित केलेल्या निर्देशांचे तंतोतंत पालन करावे. माहराष्ट्र मोटार वाहन नियम, 1989 च्या नियम 20 (1)(x) मधील तरतुदीनुसार लोकसेवा वाहनाच्या प्रत्येक चालकाने आपले वाहन स्वच्छ  व निर्जंतुकिकरण केलेल्या स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. त्यानुसार कंत्राटी बसच्या चालकाने त्यातून प्रवास करणारा पर्यटक गट बदलताना तसेच प्रवासाच्या प्रत्येक दिवशी प्रवासी बसचे निर्जंतुकिकरण करावे. बसचे आरक्षण कक्ष, कार्यालय, चौकशी कक्ष यांची वेळोवळी स्वच्छता करावी. तसेच सदर ठिकाणी उपस्थित कर्मचाऱ्यांनी कर्तव्यावर असताना मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा. बसेस जिथे उभ्या राहतात त्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. मास्क परिधान न केलेल्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देऊ नये. बसचे प्रवेशव्दाराजवळ सॅनिटायझर ठेवण्यात यावे. तसेच बसमध्ये प्रवाशांना वापरासाठी काही अतिरिक्त मास्क ठेवण्यात यावेत. बसमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रवाशांची थर्मल गनव्दारे तपासणी करण्यात यावी. एखाद्या प्रवाशास ताप, सर्दी खोकला इ. प्रकारची कोविड-19 आजाराची प्राथमिक लक्षणे दिसत असल्यास अशा प्रवाशांना बसमधुन प्रवास करण्यास प्रतिबंध करण्यात यावा. कंत्राटी बस (सिटींग) वाहनांमध्ये प्रवासी एका आड एक पद्धतीने आसनस्थ होतील अशा प्रकारे प्रवासी वाहतुकीस पनवानगी असेल.

स्लिपर बस वाहनांमध्ये डबल बर्थवर एक प्रवासी तसेच स्वतंत्र सिंगल बर्थवर एक प्रवासी याप्रमाणेच वाहतुकीस परवानगी असेल. चालकाने प्रवासादरम्यान जेवण, अल्पोपहार, प्रसाधनगृहाचा वापर या कारणाकरिता बस थांबविताना ही ठिकाणे स्वच्छ आहेत याची खात्री करावी. बसमध्ये चढताना व उतरताना तसेच खानपानाकरिता व प्रसाधनगृहाच्या वापराकरिता प्रवासादरम्यान बस थांबविली असताना प्रवासी शारिरीक अंतर पाळतील याची दक्षता घ्यावी. प्रवाशांना बसमध्ये कचरा फेकू देवू नये, त्यांना कचराकुंडीचा वापर करण्याच्या व बस स्वच्छ राखण्याच्या सूचना द्याव्यात. प्रवासी बसचे निर्जंतूकीकरण करणे तसेच त्याचे अभिलेख ठेवणे याची जबाबदारी परवानाधारकाची असेल. उपरोक्त सूचनांचे पालन न केल्यास परवानाधारकाविरूद्ध मोटार वाहन अधिनियम 1988 केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील तरतुदीनुसार उचित कायदेशिर कारवाई करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. केंद्र व राज्य शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या निर्देशानुसार तसेच प्रशासकीय दृष्टीकोनातून उपरोक्त सूचना, कार्यपद्धतीत आवश्यकतेनुसार सुधारणा करण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.