• साइट नकाशा
  • प्रवेशयोग्यता दुवे
बंद

अतिसार नियंत्रण पंधरवाड्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित

प्रकाशन दिनांक : 14/07/2021

औरंगाबाद, दिनांक 13 (जिमाका):- अतिसारामुळे होणारे बालमुत्यू शुन्य करण्यासाठी जिल्हास्तरावर अतिसार नियंत्रण पंधरवाडा 15 ते 30 जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर या कार्यक्रमाचे व्यवस्थापन व अंमलबजावणी करीता जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके यांनी सांगितले आहे.

समितीमध्ये उपाध्यक्ष म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मंगेश गोंदावले, सदस्य सचिव जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी  आहेत. तर सदस्य म्हणून महिला बाल कल्याण विभागाचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, मनपाचे वैद्यकीय अधिकारी स्थानिक आयएमए, आयएपीचे प्रतिनिधी जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे (बालरोग) विभागप्रमुख आहेत.अतिसार नियंत्रण पंधरावाडा मोहीम पर्यवेक्षणसाठी 51 जिल्हास्तरीय पर्यवेक्षक, 9 क्षेत्रीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पालक आणि काळजी वाहकांमध्ये अतिसार तसेच कोविड-19 आजाराच्या प्रतिबंध, व्यवस्थापन विषयक योग्य वर्तणूक बिंबवणे, अतिसार असलेले बालकांमध्ये ओआरएस,झिंक वापराचे प्रमाण जास्तीत जास्त होईल याची सुनिश्चिती करणे, सामाजिक व आरोग्य संस्थास्तरावर बालकांमध्ये अतिसाराच्या रुग्णांचे व्यवस्थापन योग्य प्रोटोकॉल नुसार होत असल्याबाबतचे खात्री करणे, अशाप्रकारे पंधरावडा राबविण्याचे उद्देश आहेत.

 पाच वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या घरात ओआरएस, झिंक चा वापर, उपलब्धता वाढविणे, अतिसारासह जलशुष्क्ता असलेल्या बालरुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी बळकटीकरण करणे, कोविड-19 सारख्या इतर संसर्गजन्य आजाराच्या साथी दरम्यान अतिसाराचा  प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी प्रचार, प्रसार, संवाद यावर भर देणे, शहरी झोपडपट्ट्या,  पूरग्रस्त भाग, आरेाग्यसेविका नसलेली उपकेंद्रे, भटक्या जमाती, विट भट्टी कामगार, स्थलांतरित मजूर आणि बेघर मुले आदी जोखीम ग्रस्त घटकांवर विशेष लक्ष देण्याचे धोरण पंधरवाड्याचे आहे. या मोहिमेत महिला बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी,  जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी यांचाही सहभाग राहणार असल्याचे श्री.शेळके यांनी सांगितले आहे.  

अतिसार नियंत्रण पंधरवाड्यासाठी जिल्हास्तरीय समिती गठित