बंद

अतिवृष्टी मुळे नुकसान झालेल्या भागाची जिल्हाधिकारी यांनी केली पाहणी

प्रकाशन दिनांक : 02/09/2021

कन्नड-चाळीसगाव औट्रम घाटात नुकसान

औरंगाबाद, दिनांक 01 (जिमाका) : कन्नड तालुक्यातील महसूल मंडळांपैकी 7 मंडळाचा अतिवृष्टी झाली.अतिवृष्टी मुळे मोठ्या प्रमाणावर पिकाचे नुकसान झाले. जिल्हाधिकारी यांनी नागद, सायगव्हाण, भिलदरी येथील भागातील नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला.

जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात अतिवृष्टीने कन्नड-चाळीसगाव औट्रम घाटात मोठ्याप्रमाणात दरड कोसळल्याने वाहतूक खोळंबली, नागरिकांचे नुकसान झाले. अतिवृष्टी आणि घाटातील भूस्खलनामुळे उद्भवलेल्या स्थितीची जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी 31 ऑगस्ट रोजी पाहणी केली.

पाहणी दरम्यान जिल्हाधिकारी चव्हाण यांच्यासमवेत आमदार उदयसिंह राजपूत, उपविभागीय अधिकारी जनार्दन विधाते, तहसीलदार संजय वारकड आदीची उपस्थिती होती. घाटाची पाहणी करताना अडकलेल्या नागरिकांना तत्काळ बाहेर काढावे. वाहतूक कोंडी तत्काळ सोडवावी, अशा सूचना संबंधितांना दिल्या.

परिसरातील वाहतूक कोंडी थांबविण्यासाठी पर्यायी बोगदा निर्माण करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करणार असल्याचे ही श्री.चव्हाण यांनी यावेळी सांगितले. तसेच घाटातील तपासणी नाका खुला करण्याचे आदेशही त्यांनी दिले.

पिशोर येथील गोसावी वाड्याची पाहणी

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी गोसावी वाड्यामध्ये परिसरातील मूळ नाल्यांवर लोकांनी अधिकृत बांधकामामुळे वस्तीत नाल्याचे गलिच्छ पाणी साचत आहे ग्रामंस्थाना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. या अनधिकृत बांधकामाची सखोल चौकशी करुन ते हटवण्‌याच्या सूचना संबंधितांना केल्या.

पूरग्रस्तांशी संवाद

कन्नड तालुक्यातील भीलदरी धरण फुटल्याने भोवतालची शेतातील पिके उद्धवस्त झाली या शेताचीही जिल्हाधिकारी यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांच्या भेटी घेत जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या व्यथा जाणून, तुम्ही एकटे नसून शासन आणि प्रशासन तुमच्या पाठीशी आहे. नुकसानीचे गावनिहाय पंचनामे करण्याचे आदेश त्यांनी यावेळी दिले.

नागद येथे पाहणी

नागद येथील दुकानांची पाहणी करत पूरग्रस्त व्यावसायिकांना धीर दिला. घराचे नुकसान झाले अथवा घरात पाणी शिरले अशा परिवारांची भेट घेत त्यांनी वस्तूस्थिती जाणून घेतली. पंचनाम्यांचे आदेश काढले असून लवकरात लवकर मदत पोहचवू असे जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले.